महाराष्ट्र दिन : १ मे २०१८ : डॉ. अभिराज सूर्यवंशी

जय महाराष्ट्र !

समस्त महाराष्ट्रवासीयांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

इसवीसनाच्या २०१८ व्या वर्षात आपण आहोत. रुढार्थाने ५८ वर्षं पूर्ण झाली, सध्याचा (राजकीय) महाराष्ट्र अस्तित्वात येण्याला ! महाराष्ट्र काय मागच्या शतकात निर्मिला गेला काय ? महाराष्ट्र खूप आधीपासून आहे परंतु सध्याच्या व्याख्येत तो १९६० ला अस्तित्वात आला !

पण महाराष्ट्र म्हणजे..

फक्त ३६ जिल्ह्यांचा समूह आहे काय ?
का फक्त ३,०७,७१३ चौरस किलोमीटरचा भूप्रदेश म्हणजे महाराष्ट्र ?
की फक्त कोट्यावधी लोकांचं कडबोळं ?

महाराष्ट्र ही कल्पना ‘राज्य’ ( The State ) नसून ती एक ‘राष्ट्र’ ( The Nation ) आहे.

(आपण भारतातील राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार प्रभृती विविध राज्य म्हणतो ती वेगळी कल्पना आणि एखादं सार्वभौम राज्य वेगळीच कल्पना !)

दोहोंतला फरक असा की,

राज्य म्हणजे फक्त शासन व्यवस्था असलेलं आणि भौगोलिक परिमाण असलेलं राजकीय एकक ! ते नकाशावर दिसावं लागतं !

पण..

राष्ट्र म्हणजे…

अत्युच्च मानवी मूल्यं जपून, स्वाभिमानपूर्वक आपल्या आणि आपल्या अवतीभवतीच्या लोकांची, समाजाची प्रतिष्ठा राखत, विशिष्ट ध्येयवाद धारण करत, लोकोध्दारासाठी कटिबद्ध असणा-या, आपल्या स्वातंत्र्याची पराकाष्ठेने जपणूक करताना जीव ओवाळून टाकणा-या मनानं आणि मनगटानंही दणकट-मजबूत असणा-या कणखर विचारांच्या, औचित्यपूर्ण आचारांच्या आणि सर्वांच्या कल्याणाकरता झटणाऱ्या, आपल्या धगधगत्या आणि जाज्वल्य अशा ऐतिहासिक वारशाची जपणूक करुन तो भविष्यातही तितकाच प्रदीप्त ठेऊ इच्छिणाऱ्या लोकांचा मानवसमूह म्हणजे राष्ट्र !

यासाठी राज्यासारखं भौगोलिक अस्तित्व असणे गरजेचं असतं असं नाही !

राष्ट्र मनामनात, ह्रदयात, रक्तात, विचारांत जिवंत असतं ! मग तो पेटलेला एक व्यक्ती असो किंवा भारावलेला व्यक्ती समुदाय !

उदाहरणार्थ.. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिश भारतावर स्वत:ची भौगोलिक राजकीय मालकी नसतानाही पूर्वेकडे जाऊन तिकडे आझाद हिंद सरकार स्थापन केलं की नाही ! तस्सं !

इस्राईल जरी रुढार्थाने १९४८ मध्ये अस्तित्वात आलं पण ते राष्ट्र म्हणून पूर्वापार ज्यूंच्या मनामनात जिवंत होतंच ना ! तसं !

आपण मागची हजारेक वर्षे पारतंत्र्यात होतो, पण आपण राष्ट्र म्हणून जिवंत होतो, भलेही राज्य परकीयआक्रमकांचं होतं !

आपल्या इथं यादवांनंतर, राज्य, दिल्लीच्या सुलतानांचं, नंतर मुघलांचं, विविध शाह्यांचं होतं परंतु महाराष्ट्र धर्म जिवंत होता !

आम्हांला आमची शासन व्यवस्था नव्हती की आमच्या मालकीचा भूप्रदेश नव्हता ! राज्य परकीयांचं होतं !

परंतु राष्ट्र आमच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, मराठी जनांच्या रक्तात भिनलेलं होतं म्हणूनच छत्रपती येताच अदृश्य असलेलं राष्ट्र प्रत्यक्षात उतरलं !

आणि म्हणूनच तुम्ही आम्ही एक महान अशा राष्ट्राचा, महाराष्ट्राचा भाग आहोत ! आणि आपला महाराष्ट्र आपल्या प्राणप्रिय भारत अशा भव्य राष्ट्राचा अविभाज्य अंग म्हणून त्यात थोरले पणाची भुमिका बजावतोय !

ह्या मांडणीमागचा गर्भितार्थ हाच की,

महाराष्ट्र स्वातंत्र्यप्रिय, स्वाभिमानी आणि लढवय्या आहे !

स्वत:चं राज्य असो-नसो राष्ट्राची मूल्यं जपणारा आमचा महाराष्ट्र आहे !

आपल्या तसेच अवतीभवतीच्या बांधवांसाठी धावून जाणारा आमचा हा महाराष्ट्र !

१८ व्या शतकात जेव्हा सर्वजण शेपटं घालून बसले होते तेव्हा परकीयांना पानिपतावर अंगावर घेणारा आमचा महाराष्ट्र !

हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा आमचा महाराष्ट्र !

आजच्या दिवशी प्रतिकात्मक स्वरुपात आपण महाराष्ट्र दिन साजरा करतोय ! हा संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्यामागे ज्या असंख्य मराठी जनांनी खस्ता खाल्ल्या त्या सर्वांना मानाचा मुजरा ! मुंबईत हौतात्म्य पत्करलेल्यांचे तर ॠण आपण फेडूच शकत नाही ! सीमाप्रश्न अजुनही धगधगतोयचं ! तो लवकरच सुटावा अशी तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना !

पण आज हिंदुस्थानाचा राज्यशकट हाकला जात असताना महाराष्ट्र कोठेतरी भांबावलेल्या अवस्थेत आहे का असं वाटतं ! दिल्लीला महाराष्ट्र भावत नाही का बघवत नाही अशी कोठेतरी खंत वाटते ! की आपणच कोठेतरी कमी पडतोय यावर विचारमंथन व्हायला हवं !

१८ व्या शतकात हिंदुस्थानाचं यशस्वी नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्र पुरुषाला पुन्हा एकदा उभारी घेण्याची गरज आहे !

महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या जिवंत रसरशीत रहावा ! राजकीयदृष्ट्या मजबूत कणखर रहावा ! आर्थिकदृष्ट्या सक्षम रहावा ! ही मनोमन इच्छा ! यामध्ये जे काही आपलं योगदान देता येईल, ते देण्याची तयारी करुयात !

जाताजाता…

भीमा कोरेगाव प्रकरण आता इतिहासजमा झालं ! जे होऊ नये ते घडलं ! महाराष्ट्राच्या लौकिकास ते लज्जास्पदचं ! आता जर कोणी त्या खपल्या काढायचा प्रयत्न केला तर त्यांना महाराष्ट्र खपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही !

आणि अत्यंत महत्त्वाचं…

आमच्या मायबाप शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय ! हे शिव छत्रपतींच्या महाराष्ट्रात घडणं आपल्यासाठी दुर्दैवी आहे. लाज वाटली पाहिजे. त्यासाठी सरकारने, प्रशासनाने काय योग्य ते करावचं पण आपणही यासाठी काय करता येईल असा विचार करून कामाला लागावं !

आणि जेव्हा महाराष्ट्र आत्महत्या मुक्त होईल तेव्हाच अभिमानाने जय महाराष्ट्र म्हणनं सयुक्तिक ठरेल !

आता रजा घेतो…

डॉ. अभिराज सूर्यवंशी

Leave a Reply