आचार्य विनोबा भावे

आज ११ सप्टेंबर२०१८ ! आचार्य विनोबा भावे यांची १२३ वी जयंती ! साधारण २ वर्षांपूर्वी पवनार आश्रमी जाण्याचा योग आला होता. त्यानिमित्ताने काही विचार..

सेवाग्राम पासून ६ किलोमीटर अंतरावर नागपुर रस्त्यावर धाम नदीच्या काठी पवनार गाव आहे. वाकाटक काळापासूनच ते प्रकाशझोतात होतं. परंतु पवित्र झालं ते विनोबांच्या वास्तव्याने ! विनोबांनी इथे राहून अभूतपूर्व आणि विस्मयकारी अवाका असलेलं भव्यदिव्य कार्य उभा केलं !

गांधीजींनी आणि विनोबांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला आध्यात्मिक आणि नैतिक अधिष्ठान दिलं ! राजकारणाला आणि समाजकारणाला एक उत्तुंग पातळीवर नेउन ठेवलं.

जसं तुकोब्बारायांनी छत्रपतींच्या स्वराज्य लढ्यासाठी आध्यात्मिक आणि समाज प्रबोधनाची मशागत केली तसं मी म्हणेन गांधीजी, विनोबा प्रभृतींनी तशाच प्रकारचं महत्तम कार्य केलं

आणखी एक जे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे ते म्हणजे जसं माऊलींनी वैश्विक मर्यादांच्या पलीकडे जाऊन उदात्त विचारांनी पसायदान मागितलं तसं विनोबा सबंध भारतभर फिरुन काय मागत होते तर ” भूदान ” !! विचार करा, किती न भूतो न भविष्यति गोष्ट घडत होती. जमीनदार आणि सरंजामशाहीने बरबटलेल्या भारतीय समाजाला ते, हे करताना कान धरुन ठिकाणावर आणत होते ! ‘जय जगत’चा नारा देत होते.

अशा महानतम विभूतींच्या वास्तव्याने पावन झालेल्या सेवाग्राम आणि पवनार, दोन्हीं ठिकाणी वावरतांना त्यांच्या अस्तित्वाची सत्यता आणि अनिवार्यता अजूनही जाणवत होता आणि आजच्या भंपक, बकवास आणि भ्रामक जगातून एका विशिष्ट ध्येयाकडे नेत होती.

डॉ. अभिराज सूर्यवंशी

Leave a Reply