#शुन्यशेतकरीआत्महत्या #ZeroFarmerDeath

भारतात पुढील महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्यानंतर १७ वी लोकसभा अस्तित्वात येऊन २१ व्या शतकातील भारताचं उज्वल भविष्य घडविण्यासाठी आपण निवडून दिलेले खासदार अविरत परिश्रम करतील असं अपेक्षित आहे.

त्या संसदेत पोचून, सर्व ताकदीनिशी सरकार स्थापन करुन राज्यशकट स्वतःच्याच हाती घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आता जंग जंग पछाडतील !

विविध आश्वासनांची, स्वप्नांची, प्रलोभनांची खैरात होईल.
त्यामध्ये आपल्या देशातील सर्व लोकांच्या सर्व प्रश्नांना स्पर्शून जाणारे अनेक मुद्दे असतील ! कोणी या सर्व गोष्टींच्या जंत्रीला जाहीरनामा म्हणेल कोणी वचननामा आणि कोणी आणखी काही म्हणेल !

त्यापैकी जे मुद्दे असतील त्यामध्ये आमच्या बळीराजाला, आमच्या शेतकरी राजाला चुचकारणारे, खुणावणारे सांकेतिक का होईना बरेच मुद्दे असतील, असतातचं !

जे तज्ञ आहेत त्यांनी यावर अभ्यासपूर्ण आणि सखोल मांडणी करून लेखाजोखा घ्यावाच परंतु आमच्यासारख्यांचा एक साधा सरळ सोपा प्रश्न आहे की सरकार, विविध पक्ष, संघटना आणि आपण सर्वच जण समाज म्हणून कसं काय स्वस्थ बसू शकतो जेव्हा आमचा शेतकरी आत्महत्या करतोय ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ( आणि इतर राज्यातही ) असं घडत असताना आपण एवढे असंवेदनशील कसे असु शकतो ? राज्याला, समाजाला लांछनास्पद अशी बाब घडत असताना प्राथमिकता देऊन युद्ध पातळीवर यासंबंधी आपण अंग झटकून का काम करत नाही ?

आपल्या घरातील, पाव्हण्या रावळ्यातील, शेजारील कोणाचं निधन झालं तरी आपल्याला आठवडाभर करमत नाही. घास जात नाही ! आणि आमचा पोशिंदा असलेला, राज्याचा कणा असलेला शेतकरी कोलमडून पडत असताना, नाईलाजाने आयुष्याची अखेर करत असताना आम्ही फक्त गंभीर चर्चा आणि त्रोटक उपाययोजने पलीकडे काय करतो आहोत ?

या मुद्द्याचं सध्या चालू असलेल्या निवडणुकीच्या राजकारणात किती स्थान आहे ? कोण किती गांभीर्याने विचार करतय आणि त्यासंबंधीचा आराखडा ठेवतय हे तपासून पाहण्याची गरज आहे. तरच ह्या लोकशाहीला, निवडणुकीला अर्थ आहे.

अर्थात मी असं लिहीत असताना मी हेही मान्य करतो की निश्चितच विविध संघटना, पक्ष आणि सरकार आपल्या परीने प्रयत्न करत असतीलच परंतु ते प्रयत्न तोकडे पडतायत हे स्वीकारून पुढे जाऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल ! आणि हे काय एकट्या दुकट्याचं काम नसून ती एक सामुहिक जबाबदारी आहे !

माझं सर्वांना आवाहन आहे.. वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्वांनीच आपापल्या परीने यावर योगदान द्यावं.. आणि अभूतपूर्व असं महत्वाकांक्षी ध्येय ठेवून ते गाठण्यासाठी रान उठवावं !

आणि ते ध्येय म्हणजे..

शुन्यशेतकरीआत्महत्या #ZeroFarmerDeath

आणि हे साध्य झालं तरच ती एका चांगल्या, उत्क्रांत व प्रगल्भ समाजाची आणि उत्तम व सजग सरकारची खरी पावती असेल !!!

[ ह्या माझ्या मांडणीत जाणीवपूर्वक मी तांत्रिक गोष्टींचा जसं की विषयाची खोली, कारणीमीमांसा, आकडेवारी इ. उल्लेख केला नाही. आधी, पहिल्या प्रथम याबाबत आपण संवेदनशील आणि जागृत होऊयात, या विषयाकडे लक्ष वेधुयात आणि मग पुढील क्रमप्राप्त बाबींवर परिणामकारक वाटचाल करुयात. ]


डॉ. अभिराज सूर्यवंशी

Leave a Reply