#केसरी

मागच्या आठवड्यात होळी होऊन गेली. सर्वांनी आपापल्या पध्दतीप्रमाणे, आवडीप्रमाणे ती साजरी केली असेलच.

पण खरी होळी तर १२ सप्टेंबर१८९७ ला झाली होती ! सारागढीला ! रक्ताच्या रंगात लढा पण झाला आणि रणाच्या आगीत स्वाभिमानाने देहांची आहुतीही पडली.

तिथे २१ शीख मर्दांनी केशरी रंगात न्हाऊन निघत निधड्या छातीने १०,००० अफगाणी पठाण, आफ्रीदी आणि ओरकाझाईंना अंगावर घेत दिवसभर सारागढीचा छोटासा किल्ला लढवला ! पराक्रमाची शर्थ केली. शीखांच्या इज्जतीसाठी, पगडीच्या मान सन्मानासाठी, दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी शेवटपर्यंत तुफान झुंज देत अंतिमतः मृत्युलाही लाज वाटेल, सैतानालाही कापरं भरेल असा अजस्त्र पण चिवट लढा दिला. ( आणि ब्रिटीश सम्राज्यावर उपकारच केले असचं म्हणावं लागेल ) शेवटी सर्वच जण धारातीर्थी पडले.

या सत्य घटनेवर बेतलेला पण अर्थातच सिनेमॅटिक लिबर्टी घेत बनवलेला ” केसरी ” हा चित्रपट पाहण्यात आला.. हा चित्रपट पाहताना अंगावर काटे यावेत, धमन्यांतून रक्त सळसळून ते फुटुन बाहेर येतं की काय असं वाटावं असे वीरश्रीपूर्ण प्रसंग आहेत.

शीखांचा स्वाभिमान, तत्वं, ऐतिहासिक आणि लढाऊ वारसा ह्या बाबी निश्चितच फक्त शीखांनाच नव्हे तर सबंध हिंदुस्थानाला अभिमान आणि गर्व वाटणा-या आहेत. त्यांचा इतिहास आणि वारसा त्यांनी उत्तमरीत्या नुसता जपलाच नाही तर साहित्यातून, चित्रपटातून तो त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांसमोर मांडलाय ! मांडत आहेत, मांडत राहतील ! पंजाबी, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटातसुध्दा !

आता मुख्य विषयाकडे वळतो जो मला असे काही ऐतिहासिक चित्रपट आले की निश्चित सतावतो, दुखी करतो.

हिंदुस्थानाचा इतिहास मराठ्यांच्या न भूतो न भविष्यती पराक्रमाने, मुत्सद्देगिरीने व्यापून राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पेटवलेल्या स्वराज्याच्या धगधगत्या अग्निकुंडात तावूनसुलाखून तयार झालेल्या मराठ्यांनी राष्ट्रासमोर स्वाभिमानाचा, वीरश्रीचा आणि राज्यकारभाराचा उत्तम आदर्श ठेवला.

ऐतिहासिक असे अगणित प्रसंग आहेत जिथे मराठ्यांनी प्रचंड ताकदीच्या, बलाढ्य सैन्य असलेल्या दुश्मनास चारी मुंड्या चीत केलेलं आहे. सैन्य महाविद्यालयात शिकवल्या जाऊ शकतील अशा अनेक प्रकारच्या रणनीती व कूटनितीचा अंगीकार करत मराठ्यांनी या दक्षिण आशियाच्या विशाल रणांगणात २०० वर्षं धुमाकूळ घातला. बलाढ्य अशा मुघलांना इतिहास जमा करुन टाकलं. वायव्येकडून होणाऱ्या आक्रमणांना थोपवलं, जरब बसविली. प्रसंगी रक्षणासाठी पानिपतावर प्राणाहुती दिली. ५० एक वर्षं दिल्ली राखली. आणि बरचं काही. शब्द अपुरे पडतील.

महाराजांचं तर संपूर्ण आयुष्य अशा अनेक थरारक प्रसंगांनीच भरलेलं आहे. अफजल खानाच्या काढलेल्या कोथळ्याने तर आदिलशाहीची लक्तरे वेशीवर टांगली. कीती प्रसंग आठवायचे ! त्यातील सर्वांत घातक, खतरनाक आणि धाडसी मोहीम म्हणजे ऐन मोगलाईत घुसून लाल महालावर मारलेली झडप ! त्यानंतरच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांनी मांडलेला मर्दानगीचा रांगडा खेळ ज्याच्यात मुघलांचा उरलासुरला आत्मविश्वास नष्ट होऊन त्यांच्या शेवटाची सुरुवात झाली. आणि १८ व्या शतकात तर मराठ्यांनी सबंध हिंदुस्थानाचं रणमैदान आणि राजकारण हादरवून टाकलं.

हा सर्व इतिहास आमच्या ( विशेषतः मराठी ) चित्रपट निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, पटकथा लेखकांना, अभिनेत्यांना माहित नाही असं नाही ! भालजी पेंढारकरांनी ते शिवधनुष्य पेललं देखील. आणि अशात आलेला फर्जंद निश्चितच कौतुकास पात्र आहे.

पण ह्या सर्वांची बुद्धी, प्रतिभा, कल्पकता फक्त प्रेम, तमाशा, विनोदी पण चौकटीतीलच कथा, मर्यादित सामाजिक विषय यातच अडकून पडली आहे. आणि याचबरोबर सर्वात मोठं घोडं अडायच कारण म्हणजे आर्थिक तंगी जी सर्वच मराठी चित्रपटांच्या पाचवीला पुजलेली आहे. मग ह्यांनी ऐतिहासिक विषय ताकदीने उचलायचा विषय कुठे येतो.

बरं हिंदी चित्रपट जगतातील लोक क्वचित हा विषय घेतातही पण त्याचं पार बाजारीकरण करुन त्यातील मूळ गाभाच दूषित करतात उदा. बाजीराव मस्तानी.

मग अशा पार्श्वभूमीवर केसरी सारखे उत्तम चित्रपट आल्यावर आम्हाला दु:ख तर होणारच.. आमच्याच लोकांचा राग येणार. एक म्हणणं असं येतं की चित्रपट सृष्टीवर पंजाबी लोकांच वर्चस्व आहे. त्यामुळे ते त्यांचा इतिहास, संस्कृती वारंवार दामटतात.

पण मग तुम्ही हे विसरताय का, की, भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके मराठी होते ?!!

असो.. अनेक तर्क वितर्क करता येतील, बलस्थानं कमजोर बाजू सांगता येतीलच की…

पण जेव्हा ” बाहुबली ” सारखा भव्य चित्रपट येतो तेव्हा वाईट वाटतं ! ( इथे तर राजामौलींची प्रेरणा महाराज असतात, ” कात्रजच्या घाटाचं ” रुपक तिथे बघायला मिळतं )

” ३०० ” सारखा हॉलिवूड पट येतो तेव्हा वाईट वाटतं. ( लिओनायडसच ठीक आहे पण बाजीप्रभूंनी पावनखिंड कशी लढवली असेल असा विचार बेचैन करतो )

आणि आता ” केसरी “…… केसरी निमित्त झालं हे सर्व मनातून शब्दांत यायला !

आनंदाची गोष्ट ही आहे की अजय देवगणचा ” तानाजी ” आणि रितेशचा ” छत्रपती ” हे दोन चित्रपट पाइपलाइन मध्ये आहेत ते लवकरात लवकर यावे..

आणि ह्या क्षेत्रातील सर्वांनाच बाहुबली, केसरीच्या धर्तीवर मराठ्यांचा इतिहास मांडण्याची हिम्मत येवो, सद्बुद्धी लाभो, तशी स्वप्नं पडो अशी आदिशक्ती तुळजाभवानी चरणी प्रार्थना !

तूर्तास इतकेच !

डॉ. अभिराज सूर्यवंशी

Leave a Reply