#महाराष्ट्रदिन #महाराष्ट्रधर्म

समस्त महाराष्ट्राला, उर्वरित भारतातील आणि जगाच्या कानाकोपऱ्यात मर्दुमकी, मुलुखगिरी करणाऱ्या तमाम मराठी जनांनाही महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

आज सालाबादप्रमाणे १ मे आहे. जगभरात हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.

त्याचबरोबर आणखी एक घटना याच १ मे ला पण १७०७ सालात घडली ती म्हणजे दोन वेगवेगळ्या ACTS OF UNION चं प्रत्यक्षात येणं, लागू होणं की ज्याद्वारे इंग्लंडची संसद आणि स्कॉटलंडची संसद एकत्र होऊन UNITED KINGDOM OF GREAT BRITAIN ची संयुक्तरीतीने संसद स्थापन झाली.

तसं आपल्याकडे मराठी भाषिकांचं UNION ( जुनं बॉम्बे स्टेट + मराठवाडा + विदर्भ ) होऊन एकसंध राज्य स्थापन झालं असं म्हणता येईल तर DIVISION होऊन गुजरात आपल्यापेक्षा वेगळा झाला असेही म्हणता येईल ! असो ! उगाच आपलं आठवलं आणि जागतिक पातळीवर काही संदर्भ लागतो का ते पहावं म्हणून केलेल्या वैचारिक उठाठेवीतून निघालेली ही त्रोटक माहिती ! चला पुन्हा आपल्या महाराष्ट्राकडे..

तर… १ मे.. आपल्याकडे हा दिवस महाराष्ट्र धर्माच्या, मराठ्यांच्या स्वाभिमानाच्या आणि मराठी भाषेच्या सन्मानाच्या एका भौगोलिक आणि राजकीय एककात झालेल्या रुपांतरणाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. आणि हे शिवधनुष्य ज्यांनी पेललं त्या सर्व ज्ञात अज्ञात शिलेदारांना, हुतात्म्यांना पहिल्या प्रथम विनम्र अभिवादन..

जरी हे भौगोलिक वा राजकीय एकक ” महाराष्ट्र राज्य ” म्हणवत असलं व ते १ मे १९६० रोजी कागदोपत्री अस्तित्वात आलं असलं तरी आमच्या या महाराष्ट्र धर्माचं नैतिक अधिष्ठान आणि उगम त्यापेक्षा कित्येक शतके जुना आहे की ज्याला भौगोलिक सीमांचं आणि राजकीय अस्तित्वाचं बंधन नव्हतं.

जरी मराठा आणि महाराष्ट्र ही नामाभिधानं प्रथमदर्शनी जातीवाचक किंवा प्रादेशिक वाटत असली तरी त्यामागे प्रचंड आणि प्रगल्भ अशी ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय उत्तरदायित्वाची परंपरा आहे. त्याचे इतिहासात जागोजागी दाखले आहेत. मराठ्यांनी, महाराष्ट्राने कणखर स्वाभिमानाने आपलं उत्थान तर केलंच पण भारत राष्ट्राच्या रक्षणासाठी, वैभवात भर घालण्यासाठी, राष्ट्र सेवेसाठी सदैव तत्परता दाखवून भरीव योगदान दिलेलं आहे.

म्हणूनच की काय #सेनापती #बापट म्हणतात…

महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले ।
मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले।
खरा वीर वैरी पराधीनतेचा ।
महाराष्ट्र आधार या भारताचा ।।

आणि आमच्या कल्पनेतील, काळजातील महाराष्ट्र आणि आमच्या भारता प्रति महाराष्ट्राचं नातं म्हणजे…

आमचा धर्म – महाराष्ट्र धर्म !
आणि 
राष्ट्र की सेवा में महाराष्ट्र !

सोपं.. सुटसुटीत..

पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा..

महाराष्ट्र आणि भारत जागतिक पटलावर आणखी शक्तिशाली, मजबूत आणि सामर्थ्यवान करण्यासाठी आपापला वाटा उचलूया..

जय महाराष्ट्र ! 
———————————————————————-
ता.क. —

१. नेहमीप्रमाणे.. लिहावं बरंच वाटतं.. माहितीचा, वारशाचा खजाना उघडा करावा असं वाटतचं राहतं.. परंतु आजकालच्या बदलत्या, धावत्या काळातील कमी झालेला अटेंशन स्पॅन विचारात घेता कमी शब्दांतचं नेमकेपणानं व्यक्त झालेलं बरं..

२. आज किती जणांना संयुक्त महाराष्ट्राची न भूतो न भविष्यती अशी झालेली चळवळ माहिती आहे याची शंकाच आहे. ज्यांना माहित नाही त्यांना विनंती आणि आवाहन की त्यांनी याबाबत जाणून घ्यावं. बरं असतं आपला इतिहास माहित असलेलं ! नाहीतर आपण इतिहास जमा होण्याची प्रक्रिया सुरू होते ! 
———————————————————————-

१ मे २०१९

डॉ. अभिराज सूर्यवंशी

www.abhirajsuryawanshi.com

Leave a Reply